My Blog List

Saturday, 28 March 2026

लेह लदाख- सफर खूब सुरत हे मंजिल से भी

 


तुकाराम महाराज म्हणतात,

।।नको नको मना गुंतूं मायाजाळीं ।।

पण गुंतत नाही, ते मन कसले ओ माउली.

आयुष्यात काही गोष्टी होण्याची, घडण्याची किंवा अनुभवण्याची एक ठराविक वेळ असते, ती वेळ ज्याच्या त्याच्या आयुष्यात ठरलेल्या वेळेलाच घडते , तुम्ही किती पण हात पाय मारा, जसं म्हणतात ना शिर्डी ला "बाबा का बुलावा" आल्या शिवाय शिर्डी ला जाणेच होत नाही. मग ते काय पण असो, नोकरी और छोकरी, बांगला , गाडी या पैसा, materialistic किंवा non-materialistic. 

पण आपले काम आहे, स्वप्न बघत राहणे, पूर्ण होणे नाही होणे नंतरची गोष्ट, स्वप्न बघितलेच नाही तर ते पूर्णत्वाला पोहोचणार कसे..??

माझ्या शेकडो स्वप्नातील एक स्वप्न होतं.  "होतं"असं का म्हणत आहे , कारण ते पूर्ण होण्यासाठी २० वर्ष लागली.

लेह लदाख:

माझ्या आयुष्यतील पहिली आणि अजून पर्यंत ची एकुलती एक बाईक "CBZ", लै रडा रडी करून पप्पानी घेऊन दिली. भटकंती / प्रवास/ फिरण्याचा किडा तेव्हा अंगात गेला तो तिथेच राहिला. आमचा प्रवास म्हणजे ज्यात्या दिवशी घरी परत (One day Trip). फार लांब चा टप्पा जमलाच नाही. पण हा, मी काय बायकर नाही, म्हणजे लांब लांब , मोठे प्रवास , भारी महागतली गाडी , मोठा ग्रुप: डझनान पोरंअसले काहीच नाही,  आपण एकटा जीव सदाशिव, आपला तेवढाच छोटा छोटा प्रवास.

पण जश्या सगळ्या नद्या शेवटी समृद्रात जातात, तसं गाडी वरून प्रवास करणाऱ्याची प्रत्येक वारकर्याची पांढरी म्हणजे "लेह लदाख".

एखादा छंद जोपासायला आधी वेळ असतो, पण पैसे नसतात, मग पैसे येतात पण आपल्याकडे आपल्याच छंदा साठी वेळ राहत नाही.  

एकदा का कॉलेज झाले कि मग, नोकरी, धंदा, नंतर लग्न, मुलं आणि बरेच काही, We are stuck by the thing, often called as LIFE, "It happens," ह्या समीकरण मुळे बरीच स्वप्न अपूर्ण राहतात, "लेह-लदाख" त्या असंख्य अपूर्ण स्वप्नां पैकी एक. त्याच प्रमाणे, मी पण हे स्वप्न, एक स्वप्नच राहणार म्हणून स्वीकारले होते आणि भर म्हणून लेह लदाख ला न-जाण्याची बरीच कारणं ऐकायला मिळतात. 

१. इतका वेळ नाही 

२. भरपूर काम आहे

३. बुलेट जमणार नाही 

४. फार थंडी असते 

५. Oxygen लेवल कमी आहे तिथे 

६. रस्ते फार अवघड आहेत

७. वय झाले आहे आता आमचं 

Etc Etc Etc 

यादी मोठी आहे. 

पण Like always there's a twist, आपल्या जीवनाच्या पुस्तकात भटकंती हा विषय नाहीच आहे हे मी ग्राहय धरलं असताना, मला एक कोरं पान सापडलं. आणि त्या पानाच्या प्रत्येत ओळीवर एक एक स्वप्न उमलत गेलं आणि पूर्णत्वाकडे जातंच राहिलं. ते पान म्हणजे "निलम-माझी बायको". 

तिचं एकचं म्हणणे असते, "कोण सांगतं म्हणून काही करायचं नाही, आपल्याला जे आवडते ते करायचे".

आणि तिथून आमचा भटकंती चा प्रवास चालू झाला. लेह-लदाख पण तिचा आणि तिचाच प्लॅन होता.

१. प्लँनिंग

जायचं तर आहे, पण जायचं कसं, इथून सुरवात होती. तस आम्ही गाडीने भरपूर फिरलो आहे, उत्तर-दक्षिण सगळॆ झालेले आहे, पण हा पल्ला गाडीच्या पलीकडचा होता आणि त्यात आमची गाडी पण मोठी नाही, एखाद्या जीप सारखी.

ह्या प्रवासातील आमचा सारथी आम्हाला भेटला: नवनाथ सुर्वे

नवनाथ ची "अल्पाइन हॉलिडेज" नावाने ट्रॅव्हल एजंसी आहे. आमच्या २-३ ट्रिप देशात आणि परदेशात नवनाथ नी प्लॅन केल्या होत्या. त्याचे प्लांनिंग एकदम छान असते. पण इथे उत्सव मूर्ती स्वतः आमच्या सोबत  येणार म्हणून आम्ही खुश झालो.

ग्रुप तसा बऱ्या पैकी होता, एकूण १८ मेंबर होते आणि चांगली गोष्ट म्हणजे age range २५ ते ६० होती. लिस्ट बघून भारी वाटले. 

स्वप्नांच्या मागे धावणारी आमच्या सारखी अजून कोणतरी आहेत हे बघून हुरपू आला आणि वयाच्या साठी मध्ये ही हा प्रवास करता येतो हे सिद्ध झाले. ते म्हणतात ना "Age is just a number". 

२. पॅकिंग:

हे डिपार्टमेंट पूर्णतः नीलम कडे असते. आम्ही शक्यतो कार घेऊन जात असलेने बॅग चे टेन्शन नसते. डिक्की भरून बॅग असतात. 

बॅग नं १: चिन्मय ची (आमचा चिरंजीव)

बॅग नं २ : नीलम ची 

बॅग नं ३: शूज  म्हेणजेच चपलांची

बॅग नं ४: वाटेत खायच्या खाऊ ची

बॅग नं ५: कॅमेरा लेन्स बॅटरी मोबाईल चार्जेर म्हणेज इलेक्ट्रॉनिक्स ची 

बॅग नं ६: ट्रिप साठी घेतलेल्या खास फोटो न काढलेल्या कपड्यांची

बॅग नं ७: माझी म्हणजेच ऑफिस बॅग (ह्यात काय राहिलेलं सगळं सामान कोंबण्यात येते)

पण ह्या वेळी प्रवास गाडी ने न्हवता, पण १० दिवस म्हणजे १० ड्रेस तर पाहिजेत म्हणजे पाहिजेतच.

आणि विमान प्रवास म्हंटल कि वजन ला मर्यादा आल्या.

नीलम ने सगळं व्यास्तीत २ मोठ्या आणि १ केबिन बॅग मध्ये बसवले होतेच, पण नवनाथ नी सांगितलं की ग्रुप चेकिंग मध्येमॅनेज होते, मग आम्ही सामान मन मोकळे प्रमाणे भरले. 

"To Take or not to Take" is the Question...!!!

३ ITINERARY:

आम्हाला हा प्रवास फक्त ऐकून माहिती होता, So नवनाथ म्हणेल तीच आमची पूर्व दिशा होती. नवनाथ ची लेह लदाख ची बहुदा १७-१८ वी ट्रिप होती, so त्याला चांगलेच माहित होते. 

४. नियम व अटी लागू:

लेह लदाख आमच्यासाठी एक Unexplored destination होते. शाजी बापू म्हणतात तसं: काय झाडी, काय डोंगार ,काय हाटेल, एकदम ओके आहे, असलं चित्र होतं. फ्लाईट डायरेक्ट लेह ची होती आणि आधी सांगितल्या प्रमाणे आपण एकदम ११,००० फूट वर जात असल्या कारणाने त्रास होतो. जसं की, मळमळणे, चक्कर येणे, ऑक्सिजन कमी असल्याने थकवा जाणवणे, डोकं दुखणे असं बरंच काही. आम्हाला एक गोळी त्यांनी सांगितली होती घ्यायला, ज्याने त्रास कमी होईल.

दुसरं आणि महत्वाचं बाईक चालवण्या विषयी. लेह चे रस्ते अप्रतिम आहेत. मी तर प्रत्येक वळणाच्या प्रेमात पडलो होतो, (In Love with the Curves), पण तिथे गाडी चालवताना आपला अनुभव किश्यात आणि डोकं हेल्मेट मधेच ठेवावे. मला काय होते आणि मला गाडी येते म्हणणारी बरीच जनता ट्रिप अर्ध्यात सोडून येते. रायडर साठी विशेष सूचना आहेत त्या पुढे सांगतोच.

५. श्री गणेशाय:

आमचा प्रवास कोल्हापूर मधून सुरु झाला. एकूण २० मेंबर होते. थोडे कोल्हापूर मधून आणि थोडे सातारा मधून सामील होणार होते. कोल्हापूर- पुणे by road, पुणे-दिल्ली by flight आणि दिल्ली ते डायरेक्ट लेह विमान प्रवास असणार होता. आमचे पहिले सहप्रवासी होते गुरव कुटुंब. दोघेही सरकारी कर्मचारी आणि दोघेही वयवर्षे ५०+, क्या बात, सुरवात भारी होती. सातारा मध्ये आम्ही जेवलो आणि थेट छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ला पोहोचलो. तिथे एक एक करून सगळ्या गाड्या जमा झाल्या. एक एक चेहरे दिसत होते. आधी आमची एक छोटीशी भेट झाली होती.

ग्रुप Checkin करून प्रवास चालू. विमानात बसल्या बसल्या मनात झाडी आणि डोंगर दिसू लागले होते. दोन ते अडीच तासात राजधानी दिल्ली. दिल्ली ते लेह connecting फ्लाईट होती. एक तासाचा Lay over होता. तिथे इतर ग्रुप मेंबर ची छानशी ओळख झाली, थोडे फार बोलणे झाले.

Bon Yoyage...!!!

II क्रमश II 

(पुढील भाग: प्रवास दिवस पहिला )


दिवस १:  लेह लेह म्हणजे हेच काय
(Note: Photo Bombs Ahead)

Delhi Airport
And the Day Starts with Complementary Breakfast in Plane
असा फोटो काढणे हा विमान प्रवास-शाश्त्रा मधला नियम असावा

Truth is always Stanger than Fiction

लेह मध्ये आगमन सकाळी १० च्या आताच झाले. लेह चे विमानतळ जगात भारी. विमान खाली येई पर्यंत दिसत नाही.  विमानातून बाहेर पडल्या पडल्या जो अनुभव होता ना, शब्दात बांधण्या पलीकडचा आहे. एक स्वप्न जे कधी काळी पहिले होते, ते पूर्णत्व कडे जाताना जो आनंद होता, तो आनंद आज अनुभवला होता. लेह लेह जे म्हणतात ते हेच काय, स्वच्छ निळे आकाश, पांढरे शुभ्र ढग, उंच उंच डोंगर, स्वछ हवा आणि हवेत एक शांतता, Inner peace Inner Peace Inner Peace. 

एकच विचार,,,देवा हे काय आहे....!!!

"Chasing clouds, catching dreams."

एअरपोर्ट बाहेर आल्यावर फोटो काढ कि काढ, सुट्टी नाही.  एअरपोर्ट ते लेह साठी लोकल गाड्या बाहेर तयारच होत्या. तिथून आम्ही लगेच हॉटेल वर आलो. 

Hotel Lemon Green

आमचे हॉटेल होते लेमन ग्रीन, अतिशय छान प्लस लोकेशन एकदम सिटी मधेच. आम्ही फ्रेश होऊन लगेच जेवलो.

मेरे सामने वाली खिडकी मे

View..!!

पहिली आणि शेवटची चूक:

इथे पहिली चूक झाली, ती म्हणजे फोन ला रेंज आली आणि बोलणे चालू. तिथे ऑक्सिजन लेवल कमी असते , त्यामुळे झाले काय सतत च फोन वर बोलण्याने दम लागल्या सारखा होतो. लेह मध्ये पोहोचल्यावर एक जातीने लक्षात ठेवणे , आपला फोन आणि आपले तोंड पहिला दिवस बंद ठेवणे. मला थोड्याच वेळात मळमळायला चालू झाले, डोके गच्चं आणि चक्कर येऊ लागली. आज चा प्लॅन होता शांतीस्तूप आणि रॉयल पॅलेस. खाली रिसेप्शन ला आलो तर माझा सारखे त्रस्त आणि ३-४ होते (फोन चा नियम न पाळलेले). कस-बस कार मध्ये बसून शांतीस्तूप कडे निघालो , बाहेर चे वातावरण काय औरच आहे, एकदम दुसऱ्या जगात आल्या सारखे वाटतं होते.

The View & The Roads,,,,,,Highlights of Leh & Ladakh

वळणदार रस्ते, मोठे मोठे डोंगर, वातावरणातील थंडी, लाकडी घरे, त्यांची रचना त्यांची ओळख सांगत होती. थोड्याच वेळात आम्ही शांतीस्तूप ला पोहोचलो. तब्येत बिघडत चालली होती आणि उभारायला पण येत नव्हते, नीलम चा हात धरून शांतीस्तूप पर्यंत गेलो. एक दोन फोटो काढले, नीलम शांतीस्तूप मध्ये आत गेली, पण मला काय जमेना. मी परत गाडी कडे आलो.







तब्येत अचानक खालावली, श्वास घेता येईना ना उभे राहता येईना. मी डोकं धरून एका बाकड्यावर बसलो. मनात एकच विचार, "का आलो, कशाला आलो". बाहेर चे नयनरम्य नजारे राहिले बाजूला, इथे मला अटॅक येतो का काय असे झाले होते. गाडी मध्ये गेलो तर तिथे आधीपासून आणि एक अत्यावस्त मेंबर होत्या,
अनुपम म्हणजे आमच्या ताईसाहेब. तिची परिस्थिती काय वेगळी न्हवती, त्या पण झोपून, भाऊ पुढे आणि बहिणाबाई मागे. अनुपमा ताईची पण एक ट्रॅव्हल एजंसी आहे, तिचे तर काश्मीर आवडते ठिकाण, जवळ पास ३६-३७ वेळा झाले आहे.  मला वाटलं ह्यांना सवय  असेल,पण ह्या पण आमच्या सारख्याच निघाल्या. ताईसाहेबांचे एकसारखे चालू होते, "मी काय इथे थांबणार नाही, मी उद्याच्या उद्या सकाळी परत जाणार". डोकं धरून झोपलो होतो आम्ही गाडी मध्ये.

तिथून पुढचा स्टॉप होता "रॉयल पॅलेस", जो माझा नशिबात नक्कीच न्हवता. पॅलेस चे सौंदर्य आम्ही बाहेरून एका नजरेत बघून घेतले आणि परत गाडी मध्ये गुडूप. सगळेच्या सगळे देव एकदम आठवत होते. सगळ्यांचे फिरून यायला बराच वेळ लागला, तेवढ्या छानशी झोप झाली होती माझी.


Leh Palace.....बघितले नाही,,, पण बघितले...!!!!

लास्ट स्टॉप होता लेह मार्केट. जाण्याची इच्छा न्हवती, पण सर्वांचा हुरपू आम्हाला पण थोडा जोश आला, जो भी होगा देखा जायेगा, म्हणत गाडीतून बाहेर पढत सगळी लेह मार्केट ला आलो. मार्केट म्हणजे कोल्हापूर चा महाद्वार रोड म्हणा नाहीतर पुण्याची तुळशी बाग म्हणा, जवळ पास सारखेच. तिथे चहा पिऊन ताजेतवाने होऊया असा विचार होता, पण अत्युच्य प्रमाणात घाण चहा होता तो (मी स्वतः घाण चहा करतो, पण हा त्याही पेक्षा घाण होता). पण झाले काय त्याचा मुळे पोटात मळमळणे आणि चक्कर निघून गेली, एकदम फ्रेश (म्हणतात ना "boon in disguise"). जर तुम्हाला खरेदी चा एक टक्का जरी नाद असेल, तर मार्केट मध्ये तुमचा आखा दिवस पद्धतशीर जाऊ शकतो.

मार्केट फिरून आम्ही हॉटेल वर परत आलो. रात्री छान बुफ्फे लावला होता, मेनू एकदम चवीष्ट होता. जेवण करून थोड्या गप्पा मारल्या. सर्व २० जणांची जवळ पास ओळख आता झाली होती, त्यातल्या त्यात छोटे छोटे ग्रुप बनत होते, जे साहजिक होतेच. जेव्हा नवनाथ नी सांगितले तुमच्या बुलेट पार्किंग मध्ये आल्या आहेत, फुल्ल जल्लोष. पब्लिक खुश. ५ बुलेट होत्या आणि २ इनोवा, म्हणजे १० जण बुलेट वर आणि १० गाडी मध्ये. सगळ्यांनी एक एक गाडी फायनल केली,  आम्हाला आमची हम सफर मिळाली LA02 5661 (त्यात आणि ९ बेरीज चा विषय, कोल्हापूर करांच्या मना जवळ चा) गाड्या बघून आम्ही उद्या ची स्वप्न रंगवायला सुरवात करत झोपायला गेलो.

And those were the Companion

रात्री औषध खाऊन मी झोपलो. आज चा दिवस त्रासाचा होता, पण उद्या लेह मध्ये बुलेट वरून जायचे होते, म्हणून त्या उत्साहात तात्पुरत्या आलेल्या द्खण्याचा विसर पडला होता. उद्या लेह लोकल ट्रॅव्हल जिंदाबाद.

II क्रमश II 

(पुढील भाग: मी  बुलेट आणि लेह लदाख)


दिवस :  "Enfield: The bike that turns every road into a story."

Day 2 Journey


लेह मध्ये बुलेट वर फोटो: Done
आज चा प्रोग्रॅम होता:

थिकसेय मॉनेस्ट्री >> रांचो स्कूल >>  शेय मॉनेस्ट्री >> संगम पॉईंट >> हॉल ऑफ फेम >> मॅग्नेटिक हिल. रनिंग १०० किलोमीटर च्या आत असणार होते. औषध खाल्या मुळे झोप अतिशय मस्त झाली. डोक आणि तब्येत एकदम कडक. ब्रेकफास्ट तयारच होता, बरेच ऑपशन्स होते इडली, डोसा , उकडलेले अंडे, पोहा, दूध जॅम ब्रेड आणि फ्रुट जूस पण होते. पहिला पोटोबा करत आम्ही तयार झालो.

टीप: 

जर तुम्ही लेह मध्ये गाडी चालवणार असला तर Original लायसन आणि आधार कार्ड बरोबर घेऊन जा. इथे लोकल परमिट काढावे लागते, ज्याच्या शिवाय गाडी आणि परमिट मिळत नाही. गाडी ताब्यता घेताना गाडीचा पूर्ण विडिओ काढून ठेवा, कुठं खरके असल्यास आधीच गाडी व्हेंडर ला दाखवून घ्या.

आम्ही बाहेर आलो, समोर आमच्या बुलेट हिमालय ४५०, विषय हार्ड. विशेष म्हणजे महिला मंडळ नी ऍक्सेस गाडी म्हणजे मोपेड पण घेतली होती. "बुलेट घेऊनच फिरले पाहिजे असा कुठं नियम आहे, नारी शक्ती जिंदाबाद."

दुसऱ्या प्रदेशात गाडी चालवण्याची मजाच काही और असते राव. बुलेट घेऊन डायरेक्ट "विषय पम्पावर", टाक्या फुल्ल आणि  भुर्रर्रर्रर्रर्रर्रर्र.

एक इनोवा पुढे एक इनोवा मागे आणि बाईक वाले मधी असं ठरलं, म्हणजे कळपातून एकटं भिरकटणार नाही. आमची गाडी जरा जास्त गुरगुरत असल्यामुळे आम्ही ढोक म्हणजे सगळ्यात शेवट ला होतो. हाहाहा. गावातून रास्ता काढत आम्ही हायवे ला लागलो. सकाळ चे कोवळे ऊन आणि थंड वातावरण, फिरण्यासाठी उत्तम conditions.

टीप:

बॅग मध्ये गॉगल, शूज आणि हातमोजे नक्की ठेवा, रायडींग ला पाहिजेच पाहिजे. कॅमेरा मध्ये जागा भरपूर ठेवा, ह्या वाटेवर तुमचे भविष्यातील वॉलपेपर आणि आयुष्यातल्या रोमांचक आठवणी मिळतील.

Shades of Day 2

निसर्ग सौंदर्य काय असते, ते आज कळलं. ते म्हणतात ना "Truth is stranger than fiction", मोबाईल वर, TV किंवा सिनेमा मध्ये बघणे आणि समोर बघणे मध्ये जमीन आस्मान चा फरक आहे.

Today I understood the term, Travel is a Therapy.  Roads are simply mesmerizing & Tranquil.

हे काय आहे आणि कसं आहे, ह्या विचारात आम्ही हळू हळू पुढे चाललो होतो. निसर्ग बघण्यात इतके हरवलो होतो कि आमच्या बरोबर च्या सगळ्या गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही डोंगर आणि रस्त्यांचा आस्वाद घेत होतो.

Its Pure Bliss, to Travel with People you Love

थोड्या वेळाने लक्षात आले ना मागे गाडी आहे ना पुढे गाडी आहे, मज्जाच मजा. 😜😜सगळं ठरल्या प्रमाणे झाले तर कस चालले, "The best things in life are often unplanned", आपल्याकडच्या सिमकार्ड ला रेंग नावाचा प्रकार इथे नाही, म्हणजेच गूगल मॅप्स पर्याय येतच नाही. आम्ही पुढे पुढे करत १० किलोमीटर पुढे गेलो. रस्त्याला शेवटचं नाही सरळ सरळ सरळ, थोडे थांबलो आणि यु टूर्न मारला. Like Old School पाट्या वाचत वाचत परत आलो आणि मस्त लाल लाल कलर मध्ये पाटी होती "थिकसेय मॉनेस्ट्री".

आमचा सगळा ग्रुप आधीच पोहोचला होता. बाईक पार्क करून आम्ही मॉनेस्ट्री मध्ये गेलो, ती उंच डोंगरावर होती.

मॉनेस्ट्री म्हणजे थोड्यात सांगायचे झाले तर आश्रम. इथे प्रामुख्याने तिबेट बुद्ध धर्म आहे, जो पूर्ण प्रांतात पाळला जातो.

इथे बुद्धाचे जुने पुराणे ऐतिहासिक पुतळे आहेत, धर्म ग्रंथ आहेत, चित्रकला आहेत, ज्या त्यांनी अजूनही जोपासून ठेवल्या आहेत. इथे Monk म्हणजे इथले साधू राहून इथेच साधना, ध्यान, अभ्यास आणि प्रार्थना करतात. एकदम शांत असते वातावरण म्हणतात ना, "Pin drop silence".

Life is Better with a VIEW

आतली शांतता घेऊन आम्ही मॉनेस्ट्री च्या वर गेलो, एकदम टॉप ला. आपले गड किल्ले सोडले तर उंच ठिकाण बघून मला माहित नाही, पण ह्या मॉनेस्ट्री वरून क्षितिज पर्यंत दिसत होते आणि ते ही एकदम स्पष्ट.

हे सगळे पाहून एकच प्रतिक्रिया होती, "निशब्द".

The Ambience itself is Meditation

जेव्हा काही सांगण्या पलीकडचे असते, किया शब्दात मांडता येत नाही , तसा तो अनुभव होता. थोडा वेळ थांबून आम्ही बाहेर पडलो, कारण प्रवास फार होता आणि वेळ कमी. आम्ही गड उतार झालो आणि पुढचा टप्पा होता, अमीर खान चा ३ Idiots मधला "रँचो स्कूल".

Colours of Rancho

रँचो स्कूल एक वास्तविक शाळा आहे, जी ३ Idiots मुळे प्रसिद्धीत आली. बघण्या सारखे फार काही नाही, पण तुम्ही तिथे १-२ तास घालवू शकता. फोटो साठी उत्तम पर्याय. तिथेच एक कॅफे आहे, तिथ किरकोळ मध्ये थंड घेऊन आम्ही पुढे "शे मॉनेस्ट्री" ला निघालो, जी तिथून जवळच होती. 


The Team, The Journey, The Location and The Life time Memory...Rancho School Photo Stop

ह्या रूट वर फोटो एकदम मस्त येतात, जापान चा ब्लॉसम सिजन च्या फोटो सारखे रस्ते आहेत.

आम्ही इथे "शे मॉनेस्ट्री" ला न जाता, "शे पॅलेस" ला गेलो जो अगदी समोरच आहे. इथे बुद्धा ची प्रचंड मोठी आणि सुरेख मूर्ती आहे. शे पॅलेस च्या दारात फोटो अगदी मस्त येतात.

मंदिर म्हणजे शांतता, पण आम्ही असताना शांतता कशी असेल. तिथे जेष्ठ महिला मंडळांची चर्चा सत्रे चालू होती. ग्रुप प्रवासाची खासियत म्हणजे भेटणारे लोक आणि त्यांचे आयुष्य , त्यांनी पाहिलेले पावसाळे आणि त्यांचा मोलाचा अनुभव. थोडं भारी वाटलं, एक नवीन अँगल , एक नवीन विचार कळाला. Its always Good to Travel with Interesting People.


Candid at Shey Monastry

तिथे जरा किरकोळ मध्ये फोटो शूट करून आम्ही आटपते घेतले.

वेळ झाली होती दुपारच्या जेवणाची. इथे होते मोठे Surprise. दुपार चे ठिकाण होते " हॉटेल खानावळ". लेह मध्ये येऊन "शुद्ध महाराष्ट्रीय" पद्धतीचे जेवण म्हणजे सुखद धक्काच होता. शक्यतो आपल्या राज्य बाहेर आपला पदार्थ कधी खाऊ नये, पदरी नेहमी निराशा येते. थाळी ऑर्डर देऊन आम्ही आत गेलो तर, आणि एक धक्का भारतीय बैठक, हे अपेक्षित न्हवते, थाळी आली, सगळले पदार्थ दिसायला तर उत्तम होते. महिला मंडळ नी तर चक्क "जय जय रघुवीर समर्थ" चा जेवणा पूर्वी मंत्र पण म्हंटला. जेवण चालू झाले तर अजून एक धक्का "ताक" आले. मनात म्हंटलं "बस कर पगले, रुलाएगा क्या". धक्क्यावर धक्के. हॉटेल चे मालक महाराष्ट्रातील असून तिथेच ७-८ वर्ष पासून स्थायिक आहेत. चव आणि स्वच्छता व्यास्तीथ आहेत.

"जय जय रघुवीर समर्थ" 

मग चालू झाला खरा गाडीचा प्रवास लेह ते संगम पॉईंट. एक-दोन तासाचा प्रवास होता.  मस्त रस्ते, सवालच नाही, वातावरण एकदम यूरोप स्टाईल होते. लांबच लांब रस्ते, घर नावाचे काहीच नाही. दोन्ही कडे क्षितिजा पर्यंत जमीन आणि जमिनीच्या शेवटाला आकाशी झेप घेणारे डोंगर.

जर तुम्हाला बाईक चालवायची, एक टक्का जरी आवड असली, तर हा प्रवास कधीच चुकवू नका,

आणि एक हा प्रवास संपता संपता तुमच्या तील स्टोरी टेलर नक्की जागा होणार

"Believe me LEH will make you a STORY TELLER".

"संगम पॉईंट" ला जाताना "मॅग्नेटिक हिल" नावाचा प्रकार लागतो. शब्दशः अर्थ काढला तर चुंबकीय डोंगर. इथे आम्हाला सांगण्यात आले होते, ते गाडी चढतीला उलटी जाते, पण तसे काही जाणवले नाही. पण परत इथे हि फोटो छान येतात, एकदम सरळ रास्ता आहे , म्हणून फोटो आणि विडिओ ला भरपूर स्कोप आहे. 

Magnetic Hill, Magnetic Riders,,,🚵👫

आम्ही पुढे नदी कडे निघालो.संगम पॉईंट म्हणजे थोड्यात आपली नरसोबाची वाडी, दोन नद्यांचा संगम. इथून कृष्णा तिथून पंचगंगा अगदी तसंच, इथून "इंडस म्हणजेच सिंधू" नदी आणि दुसरी कडून "झंस्कार नदी", पण पण पण हे चित्र अद्भुत आहे.

एका नदीचे पाणी पूर्ण पणे निळे आहे आणि डोंगरातून आलेल्या नदीचे पाणी एकदम गडुळ, जेव्हा दोन्ही नद्या एकजीव होतात, तो नजारा मस्तच आहे. In Life, its the same isnt it, People with different background, but same Aim, same journey, when they come together, they look amazing together.

Funtime at Sangam point


SANGAM POINT
तिथे रिव्हर राफ्टिंग देखील आहे.खळखळत वाहणारी नदी, गार गार वारे, न टोचणारे उणं आणि त्यात कडक चहा म्हंटलं कि मूड एक नंबर. नदी काठी बसून गरम गरम चहा म्हणजे स्वर्गच. आम्ही थोडा वेळ इथे रमून बाहेर पडलो. ४ वाजून गेले होते. आता परतीचा प्रवास चालू.

फक्त वाटेत येताना "हॉल ऑफ फेम" Museum आहे, ते पण करायचे होते. लेह मध्ये बुलेटच का ??? ह्या प्रश्न चे उत्तर ह्या रस्तावर मिळाले, जिथे इतर गाड्या चढती चढायला आकसत होत्या, तिथे बुलेट सुसाट होती.विशेष म्हणजे महिला मंडळ ऍक्सिस वर हळू हळू का असेना, पण जोश मध्ये होते.

हॉल ऑफ फेम, हे एक भारतीय सेना चलित संग्रहालय आहे, जिथे बऱ्याच युद्धात वापरलेले शस्त्रे, राहिलेले अवशेष, युद्धनीती चे विश्लेषण करणारे छायाचित्र, युद्धा मध्ये शाहिद झालेले वीर योद्धे यांचे तपशील, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. लेह मध्ये आल्यावर न चुकवण्या सारखे हे ठिकाण.

इथे आले कि कळते, आपला मोकळ्या स्वशाची किंमत किती आहे आणि त्या साठी किती विराणी आहुती दिली आहे.

Jai Hind

इथे लाइट शो पण असतो. वेळ असेल तर तो पण नक्की बघा. तिकीट १५०/- प्रति व्यक्ती. देशभक्ती ची भावना घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो ती थेट हॉटेल च्या दिशेने. Day Spent well, सुरवात तर धमाकेदार झालेली. आम्ही कंटाळून रूम मध्ये आलो. रात्री जेवणात महाराष्ट्रीय मेनू चा बुफे होता.

टीप:

१. सुटसुटीत कपडे वापरा, कारण पूर्ण दिवस बाईक वर जातो.                                                                            २. गॉगल पाहिजे म्हणजे पाहिजे.                                                                                                                       ३. Sunscreen असले तर नक्की घ्या, मी टी-शर्ट घातला तर हात पूर्ण पने उन्हाने करपला.                                       ४. पाणी भरपूर प्या, जास्त पळा पळी नको, ऑक्सिजन लेवल कमी असल्याने त्रास होऊ शकतो.

अश्या तऱ्हेने दिवस दुसरा समाप्त.



दिवस तिसरा: लेह ते नुब्रा व्हॅली:

Day 3 Journey


Shades of Day 3

आज चा दिवस भारी असणार होता, कारण आज बुलेट हायवे करत करत डोंगरावर जाणार होती.                 "दुनिया गई भाड मे, हम चले पहाड मे"

जसा राजांचा गड आणि गडांचा राजा "राजगड", तसाच ह्या असंख्य डोंगरदरी तील, असंख्य डोंगरा मधील एक, 
जगातील सर्वात उंच, गाडी चालवत जाऊ शकेल असा म्हणजे "खारदूंगला पास" आणि हा पास आम्ही बुलेट वरून पास करणार होतो.
"Khardung La- highest motorable road in the world"
आता त्या पेक्षा हि उंच पास झाले आहेत, पण खारदूंगला पास नी उंचीच्या शर्यतीत खिंड बरेच वर्ष लढवली आहे.

सगळे नाश्ता करून तयार होते. आमची सवारी ५६६१ तयारच होती. १ इनोवा पुढे १ इनोवा मागे आणि दोघां मध्ये ५ बुलेट, Well that was the Plan A. आम्ही लेह चं हॉटेल चेक-आउट केले आणि बॅग भरून बाहेर ठेवल्या. १८ लोकांच्या बॅग त्या कार्यकर्त्यांनी एकदम पद्धतशीर टपावर बसवल्या. सोबत गाडी असण्याचा एक फायदा आणि गाडी मध्ये एक मिस्त्री पण होता.

लेह भल्या भाल्यांच्या परीक्षा घेतो, मग तो माणूस असो वा वाहन, आधी मधी Break-Down होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून बॅकअप साठी मिस्त्री देखील होता. त्याची केस मोठी आणि कुरुळी होती म्हणून त्याचं बारसं केलं सगळ्यानी ,"मॅगी भैय्या". आणि एक चांगली गोष्ट म्हणजे, मॅगी भैय्या चांगला फोटोग्राफर पण होता. सगळ्यांचे त्याने चांगले चांगले फोटो न दमाता प्रेमाने काढले. स्टार्टर मारला आणि भुर्रर्रर्र.

लेह सोडल्यावर एका ठिकाणी आम्हाला अडवण्यात आले. Routine checkup होता. त्यांनी सर्व गाड्यांचे परमिट & लेह लदाख चे परमिट तपासले आणि सोडले. लेह लदाख च्या रस्त्यांवर तुम्ही प्रेमात पडाल, पण एक लक्ष्यात राहूदे "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक".

Leh will test you,
Your Patience,
Your Health,
Your Apetite,
Your Attitude at that Altitude,
Your Character as a person,
Your Nature,
Your Skills
In short it will test your entire Personality.

Mark my words, you will be different person, once you are through the Leh Ladakh BIKE journey.


आम्ही वाटेत पेट्रोल पंप वर थांबलो, तिथे ठळक अक्षरात बोर्ड होता, "The Worlds Highest Altitude Retail Outlet (12,067 Feet)".

12067 Feet

इथे टाकी फुल्ल करून आम्ही पुढे निघालो. एक एक डोंगर चढत होतो, रस्त्याचे काम चालू असल्याने , अधे मध्ये थोडे खराब रस्ते होते. एकाबाजूला महाकाय डोंगर आणि दुसरी कडे एकदम खोल दरी. मध्ये मध्ये आम्ही छोटे ब्रेक घेत होतो, पण एक इनोवा मागे असलेने जास्त वेळ थांबत न्हवतो.

थोडं वर आल्यावर एक मोठा बोर्ड दिसला, "First View of Leh".
आम्ही लगेच फोटो स्टॉप घेतला.
फोटो काढता जेव्हा एका दगडावर हाताची घडी घालून समोर पाहू लागलो तर,
First View of LEH

रस्ता शांत,
वातावरण शांत,
डोंगर शांत,
दरी शांत,
लांब - लांब पर्यंत मानव वस्ती नाही,
ते सगळं अनुभवून,
डोके शांत,
शरीर शांत,
मन शांत,
अंतर मन शांत,
सगळं एकदम शांत.
ना कसला आवाज, ना कसली हालचाल,
काही न बोलता निसर्ग बोलत होता, "The Silence in the Mountain has Voice and Its Too Loud."
म्हणतात ना, "Silence is not Silent".
अजून एक म्हण,
"Silence also has a Voice, but it needs a Soul to Understand it".
त्या शांततेत एक आवाज होता,
मनात शून्य विचार,
फक्त वाऱ्याचा आवाज,
फक्त मोकळा श्वास,
I was Living that Moment,
I was Enjoying that Moment,
I was Seizing that Moment,
I was Anticipating that Moment,
I was Surrendering that Moment,
Close your eyes,
Breath In- Breath Out
Breath In- Breath Out
म्हणून यालाच बहुतेक म्हणतात, "Travel is a Therapy".


मला एक कळले, "we don't travel to explore places, we travel to explore yourself",
काहीतर शोधता शोधता, माझा मला मीच सापडलो.

थोडा वेळ तिथे थांबून आम्ही परत डोगंराच्या मागे पळू लागलो. बुलेट ने येणाऱ्या प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक रस्तावर अप्रतिम साथ दिली. एकामागे एक चढ येत होते आम्ही वर वर जात होतो.अधे मध्ये बरेच बायकर ग्रुप भेटत होते. तुम्हाला प्रवासात असे भेटले तर Thumbs Up करा, समोर कार्यकर्ते खुश होतात. विशेष म्हणजे, एक दोन सायकल वरून प्रवास करताना दिसले, याला धाडस म्हणू कि आणि काय..!! 
गाडीवर बसून स्वास घेता येत न्हवता आणि इथे ही माणसं सायकल वर, विशेष आहे.
जस जस उंची वाढत होती, थंडी पण हळू हळू वाढत होती. आणि "ते वळण आले", शेकडो कोस चालून आलेल्या वरकऱ्याना जसं मंदिराचे कळस बघून आनंद होता, अगदी तसाच आनंद मला झाला.
Border Road Organizaotion: Project Vijayak
54 RCC Welcome you to Khardungla Top (17982 FT)
The Gate way to Nubra Valley.

Khardungla Top

पोहोचलो बाबा एकदा म्हणून , म्हणून निश्वास सोडला. हातमोजे (Hand-Gloves) घ्यायला विसरू नका. तिथे मिळतात पण महाग विकतात. आम्ही तिथे विकत घेतले, थंडी मुळे हात एकदम गोठतात.
Khardungla Top

नवनाथ नि सगळ्यांना आधीच सूचना दिल्या होत्या, "इथे दंगा करायचा नाही" (दंगा म्हणजे जास्त उड्या मारणे, पळा पळी करणे). इथे ऑक्सिजन एकदम कमी असते, त्याचे म्हणणे बरोबर होतेच. 
इथे आम्हाला चांदणी मधली श्रीदेवी काळ्या साडी मध्ये दिसली, विशेष आकर्षण.
तिथे थोडेफार फोटो काडून आम्ही डोंगर उतरू लागलो. गाडी बंद करून "Out-Off" चा विचार पण करू नका,
उत्तर एकदम खतरनाक आहे, "It will test your riding skills on the Slope & Steep Curves."

एक इंनोवा पुढे गेली होती आणि एक मागे. आम्ही निसर्गाचा आनंद घेत हळू हळू घाट उतरत होतो.
समोर एका मिलिटरी दवाख्यात आमची गाडी थांबलेली दिसली. आम्ही थांबलो, वतला समोर टपरी आहे चहा चा कार्यक्रम असेल. पण मोठा गोंधळ उडाला होता, आमचे सरपंच भारत शेट आणि आमची बारकी इशा दीदी, दोघे पण कमी ऑक्सिजन मुळे त्रासले होते. मी पळत आत गेलो, भारत डोळे पांढरे करून आणि इशा डोकं धरून रडत होती. त्यांना असे पाहून इतर मेंबर घाबरले होते. पण चांगली गोष्ट म्हणजे मिलिटरी दवाखाना असल्याने त्यांनी लगेच प्रतिमोपचार लगेच चालू केले आणि अजून चांगले म्हणजे तिथला स्टाफ सडोली, कोल्हापूर चा होता.

त्या सगळ्या गोंधळात, भरतशेठ चे ते वाक्य, "माझं २ गुंठे शेत विका, पण मला खाली न्ह्यायला हेलिकॉप्टर मागवा".

हसू का रडू काय कळत न्हवते, "He was hallucinating". थोड्या वेळाने दोघेही नॉर्मल झाले मग आम्ही डॉक्टर ला धन्यवाद करून परत पुढे निघालो. 
Diskit Monastery

भव्य दिव्या डोंगर आणि त्या मधुन वाट काढत जाणारा रास्ता, हा नजारा अजून कुठे हि नाही. पुढचे ठिकाण होते ,"डिस्कीत मॉनेस्ट्री". मॉनेस्ट्री म्हणजे परत एक डोंगर आणि परत एक बुद्धा ची मूर्ती. डिस्कीत मॉनेस्ट्री एका टेकडीवर स्थित आहे, अगदी लांबून त्यावरील बुद्धा ची मूर्ती दिसून येते. आम्ही वर गेलो. सगळ्या मॉनेस्ट्री एक सारख्या आहे, तरीपण सगळ्या बघून घ्या, प्रत्येकाची कायतर खासियत आणि विशेष बाब आहे. वर चा पुतळा अगदी मोठा आहे, त्याचे बांधकाम एकदम challenging असणार. मूर्थीची उंची ३३ मीटर म्हणजे जवळ पास १०८ फूट आहे. मूर्तीचे नाव आहे मैत्रेय बुद्धा. त्याला शांततेचे प्रतीक मानले जाते.छान ठिकाण आहे, १-२ तास निवांत वेळ जातो. तिथे एक कप चहा मारून आम्ही पुढे निघालो.

In and Around Diskit

पुढचे ठिकाण होते "हुंडर सॅण्ड ड्यून्स". राजस्थान मध्ये गरम वाळू आणि लेह मध्ये गार वाळू.आणि वाळू म्हंटलं कि उंट आलेच. पण इथल्या उंटांची खासियत म्हणजे त्यांच्या वरील "Hump" म्हणजेच कुबड, त्यांना "Double-humped Bactrian camels" म्हणतात. जर तुम्ही राजस्थान ला जैसलमेर ला गेला असाल तर हे अगदी तेच, फक्त तिथे वातावरण गरम असते इथे थोडे गार. Tourism म्हणजेच पर्यटन जास्त असल्यामुळे इथे थोडे खेळ, गाणी आणि मस्ती मजा आहे.  उंटाची सवारी करता येते, इथे desert सफारी चा पर्याय नाही, Cars & Bikes not allowed in Sand. आम्ही पण थोडे फार दंगा मस्ती करून तिथून निघालो. ह्या ठिकाना साठी २-३ तास वेळ ठेवा. दुपार संपत अली होती, हवेत गर्व जाणवू लागला होता.


झिंग झिंग झिंगाट


Serene Nubra

Shades from Nubra
Ride on Game on


गाडी आणि आम्ही सगळेच दमलो होतो, आज चा शेवट "नुब्रा वॅली" होता. अंतर २ तासाचे होते. सगळा जोश मंदावला होता, आम्ही इनोवा मागे गाडी लावली, शांत रास्ता, निवांत वातावरण, एकूणच सगळं रिलॅक्स. हॉटेल वर पोहोचे पर्यंत थोडा अंधार पडला होता, टेन्ट होत्या म्हणून सगळी खुश.

आज चे हॉटेल होते, "नुब्रा समर कॅम्प". नवनाथ चे हॉटेल सिलेक्शन ला तोड नाही.
टेन्ट मस्तच होत्या, डबल नेट, प्रत्येक टेन्ट बाहेर खुर्च्या आणि मोकळी जागा, अटेच  वॉशरूम, गरम पाणी, डबल बेड, पंखा, खाली जिमखाना आणि बरेच काही. एका ओळीने टेन्ट होत्या, मोठं असं ग्रुप सिटिंग होते, जेवायला हॉल होता.
आम्ही गार्डन मध्ये बसलो तो पर्यंत गरम गरम चहा आणि बिस्कीट अली. पायातून बूट काढल्यावर भारी वाटलं राव आणि त्या वातावरणात चहा पिऊन एकदम आ हाहा, विषय हार्ड. सगळ्यांना एक एक टेन्ट देण्यात अली. आम्ही फ्रेश होऊन परत गार्डन मध्ये आलो. गुरुनाथ आणि नवनाथ ची तिथे कॅम्प फायर ची तयारी चालू होती. मस्त मोठी म्युसिक सिस्टम विथ माईक तयार होती. त्या दिवशी त्या हॉटेल मध्ये फक्त आमचा ग्रुप होता, म्हणजे "होल वावर इस आवर". एका मागे एक गाणी चालू झाली, प्रत्येकात दडलेला एक कलाकार बाहेर येत होता. सगळे मुक्त मनाने आनंद लुटत होते. हे समीकरण पुढे एक-दोन तास चालू राहिले आणि ठरल्या प्रमाणे शेवट डान्स नी झाला. We enjoyed the time like anything. ठरल्या प्रमाणे जेवण तयार होते, दमून आलेले सगळॆ कार्यकर्ते मनसोक्त जेवून झोपी गेले. 
A day well spent again.
दिवस भराच्या आठवणीत आणि उद्याच्या स्वप्नात आम्ही सगळे झोपी गेलो.
उद्या मोठा दिवस होता, पॅंगॉंग लेक.

II क्रमश II 

चौथा दिवस :  नुब्रा- चांगला पास- पॅंगॉन्ग लेक


Blissfull Nubra Morning

Shades of Day 4

नुब्रा मधला टेन्ट स्टे मस्त होता. दिवसभराची धावपळी आणि रात्रीच्या गाणं आणि दंग्या च्या कार्यक्रमा मुळे शांत झोप लागली. सवई प्रमाणे सकाळी जरा लौकर डोळे उघडले. टेन्ट बाहेर चे वातावरण एकदम शांत होते. बाहेर गार्डन मध्ये येऊन बसलो, आमच्या हॉटेल च्या मागचा डोंगर अतिशय मोठा दिसत होता. मंद वारे वाहत होते, वातावरणात थोडीशी थंडी जाणवत होती. मी चहा तिथेच मागवला. डोंगर, झाडी, सकाळ आणि थोडी थंडी हे समीकरण एकदम मोहक, घातक आणि रोमांचिक असते. (रोमांचिक म्हणजे रोमँटिक च्या अजून पलीकडे).
एक-एक मेंबर आवरून बाहेर येऊ लागले. विशेष म्हणजे आज नाश्त्याला पोहे होते आणि ते ही शेंगदाणे घालून. थोडेफार फोटोसेशन करून आम्ही बॅग घेऊन रिसेप्शन ला आलो. आमचा मिस्त्री उर्फ मॅगी भैय्याने  बाईक चे General checkup केले होते. ऑइल लेवल आणि ब्रेक सेटिंग करून गाड्या एका लाईन मध्ये तयार होत्या.
लेह लदाख च्या आमच्या प्रवासातला आज चा दिवस सगळ्यात मोठा असणार होता, कारण प्रवास जवळ पास ३००+ किलोमीटर चा होता. 
काय ती गाडी चालवायची हौस म्हणा नाहीतर कोल्हापुरी भाषेत खाज म्हणा, ती आज पूर्ण होणार होती. गुळगुळीत रास्ता सोडून आज दगड, पाणी , खड्डे आणि काडे-कपार असणार होते, So called Off-Roading.

थोड्याच वेळात आम्ही आमचा मोठा प्रवास चालू केला.

लेह तुम्हाला परत परत प्रेमात पाडेल, रस्ते मोहात पाडतील आणि हा प्रवास तुमच्या आयुष्यातील एक ठळक आणि जसं म्हणतात ना तसा अगदी अविस्मरणीय होईल. आज फक्त, फक्त आणि फक्त रस्ता होता, हा ह्या प्रवासातील एक आवडता क्षण. ठरल्या प्रमाणे, एक इनोवा पुढे एक इनोवा मागे.

सुरवातीला जोश असल्यामुळे गाड्या पळवा पळवी होते, पण हा सफर काय छोटा न्हवता आणि पळवणार तर किती. 
हे चित्र आणि वातावरण, मोबाईल/ TV / सिनेमा मध्ये बघणे आणि प्रत्येक्षात वास्तविक मध्ये बघणे जमीन अस्मान चा फरक.
I had imagined doing this, hundreds of time in my thoughts & dreams, but doing in reality was real just Amazing & Awesome.
तुम्ही जर लहान पाणी "रोड रॅश" हा विडिओ गेम खेळला असाल तर, तुम्हाला तुमचे बालपण नक्की आठवेल. त्यात जे बॅकग्राऊंड ला डोंगर होते , इथे तशेच आणि जवळपास तेच डोंगर आहेत, असा भास होईल.
आम्ही गाडी सलग चालवत होतो, कुठे ही थांबा नाही. जवळ पास दोन तासाच्या प्रवासानं नंतर एक मस्त पॉईंट/ लोकेशन आले. जस आपल्या आंबा घाटात गणपती मंदिर आहे, जिथून पूर्ण घाट दिसतो, शक्यतो प्रत्येक घाटात असा एक ना एक स्पॉट असतोच, हा त्या सारखाच एक. आम्ही तिथे थोडी विश्रांती घेतली. किरकोळ मध्ये फोटो सेशन केले.

अगदी छान असे ते ठिकाण. त्यांनी पुढे जाण्या साठी रॅम्प केला होता, शेवटला मचाण/ गॅलरी सारखे होते. तिथून ती दरी / वॅली एक टोका पासून दुसऱ्या टोका  पर्यंत दिसत होती. त्या जागे ची भव्यता जाणवत होती. लांब लांब कुठे तरी जाणारा एखादा ट्रक, एका बिंदू/ ठिपक्या एवढा लहान दिसत होता.
 
Photo Stop

लेह ची एक खासियत आहे असा मला वाटतं, इथे शांतता आणि मनशांती कुठे हि सहज मिळते. गाडी वरून जाताना फक्त वारं आणि इंजिन चा आवाज येतो, गाडी थांबली कि सगळं एकदम शांत. रस्ता शांत, मन शांत , डोकं शांत आणि विचार पण शांत. आवाज पण फक्त मनातल्या विचारांचा येतो. त्या स्पॉट ला त्यांनी एक कमान उभी केली आहे, हे लेह मधील बांधकामाचे प्रतीक आहे, तिथले प्रत्येक बांधकाम अश्याच प्रकारचे आहे आणि हे सगळे लाकडात आहे ज्याच्यावर कोरीवकाम आहे, अगदी अप्रतिम. थोडे फार फोटो/ थोडे फार विडिओ आणि अगणित आठवणी घेऊन आम्ही तिथून निघालो.
थोडे पुढे आल्यावर डांबरी रास्ता गायब, समोर होता मुरूम आणि मुरूम. मज्जाच मज्जा. हे तर पाहिजे होते राव. हळू हळू प्रवास चालू होता, स्पीड कमीच होते, कारण रास्ता खडतर होता आणि एक मोठे वळण आले, जिथे भरपूर गाड्या थांबल्या होत्या. आम्ही पण थोडे मागे थांबलो, समोर एक नदी होती, एक छोटा पूल होता आणि तो पूल थोडा पाण्यात गेला होता. कार थांबल्या होत्या , पण बाईक हळू हळू जात होत्या. 

आम्ही पण जरा कुतूहलाने बघायला पुढे गेलो, कंप्लेट माहोल. एक गेला धडपडला, दुसरा गेला अडकला, खड्ड्या मध्ये गाडी एंजिन पर्यंत पाण्यात जात होती, गुढगाभर पाणी आणि त्यात अली लॉर्ड अल्टो (मला आता कळाले अल्टो, ही लॉर्ड अल्टो लेह मध्ये झाली). भावाने गाडी एका कोपऱ्यातून घातली, ते डायरेक्ट शेवट पर्यंत आरपार, सुट्टी नाही.

Off Roading was Fun

हे बघून आणि एकानी गाडी घातली पण ती अडकली. इथे आमचे गुरुनाथ गुरुजी पुढे आले आणि आपल्या कौशल्याने त्यांनी ती गाडी सहज बाहेर काढून दिली. आता आमचा नंबर, नीलम म्हंटली मी काय पाण्यात पाय ठेवणार नाही आणि चालत पण जाणार नाही. तसंच आम्ही डबल सीट निघालो. पहिला वाटले अवघड असेल, पण एकदा का बुलेट चा बॅलन्स सापडला तर कुठे अडत नाही. बुलेट म्हणजे २०० किलो चा गणपती , एकदा बसला कि बसला. आम्ही सहज तो पूल क्रॉस करून पुढे आलो. गार गार पाणी बुटातून सॉक्स मध्ये आले होते. गुढघ्या पर्यंत पॅन्ट ओली झाली होती. पण हा अनुभव भारी होता. भरपूर थंडी आणि त्यात शूज मध्ये पाणी , विषय वेगळाच एकदम.
प्रवास हळू हळू चालू होता. बरेच रिव्हर क्रॉसिंग लागले, काही ठिकाणी रास्तच वाहून गेला होता, पण गाडी जाण्या इतका बारा होता. मी विचार करत होतो कार वाले कसे जात असतील, अत्युच्य रोमांच असेल त्यात पण.
इथे इनोवा मध्ये बसलेले भस्मे साहेबांनी सर्वांचे मस्त फोटो आणि विडिओ काढले. त्या रस्त्यांवर स्वतःला गाडी चालवताना व्हिडिओ मध्ये बघायला मस्त वाटते.

One from the Bucketlist

वर जाईल तशी थंडी वाजत होती आणि थंडी वाढत होती. काल घेतलेले हात मोजे होतेच आणि जॅकेट तर पाहिजेच पाहिजे. बराच वेळ सलग गाडी चालवून बुडाला मुंग्या येतात राव, म्हणून अधे मध्ये थांबून थोडे पाय मोकळे केलेले बरे. चढती चढत चढत शेवटी आम्ही "चांगला पास" गाठला. चांगला म्हणजे "जोतिबाच्या नावाने चांगभलं" मधला "चांगला". हा पास खारदूंगला पेक्षा थोडा जामी उंच आहे, पण वातावरण एकदम मस्त.

Changla Re Changla

आमचे काय नशीब होते, बरोबर पास ला गाडी थांबली आणि थोडा फार का असेना बर्फ पडला. बर्फाचे आणि पावसाचे थेम्ब पडताना बघण्यात एक वेगळाच आनंद आहे. शेवटी पाणीच ते, पण बहूपुरी. खारदूंगला पेक्षा इथे गर्दी कमी लागली, इथे आम्ही भरपूर फोटो आणि विडिओ काढून घेतले. "चांगला पास" च्या "माईल स्टोन" वर बसलेला ठरलेला फोटो आणि बरेच काही. डोंगराच्या शेंड्याला बर्फाने घेरले होते. जसा राणी च्या डोक्यावर मुकुट चमकतो, बायकोच्या केसात गजरा शोभतो, तसा पंधरा शुब्र बर्फ देखील आपले अस्तित्व ठळक पणे सांगत होता. आम्ही तिथे बऱ्याच आठवणी साठवल्या आणि आम्ही डोंगर उतरू लागलो.
 
In Love with the White Silence

एक इंनोवा पुढे गेली होती आणि एक मागे. आम्ही निसर्गाचा आनंद घेत हळू हळू घाट उतरत होतो. समोर एका मिलिटरी दवाख्यात आमची गाडी थांबलेली दिसली. आम्ही थांबलो, वाटलं  समोर टपरी आहे "चहा" चा कार्यक्रम असेल. पण मोठा गोंधळ उडाला होता, आमचे सरपंच "भरत शेट" आणि आमची बारकी "इशा दीदी", दोघे पण कमी ऑक्सिजन मुळे त्रासले होते. मी पळत आत गेलो, भारत डोळे पांढरे करून आणि इशा डोकं धरून रडत होती. त्यांना असे पाहून इतर मेंबर घाबरले होते. पण चांगली गोष्ट म्हणजे मिलिटरी दवाखाना असल्याने त्यांनी लगेच प्रथमोपचार चालू केले आणि अजून चांगले म्हणजे तिथला स्टाफ सडोली, कोल्हापूर चा होता.
 
त्या सगळ्या गोंधळात, भरतशेठ चे ते वाक्य, "माझं २ गुंठे शेत विका, पण मला खाली न्ह्यायला हेलिकॉप्टर मागवा"हसू का रडू काय कळत न्हवते, "He was hallucinating". थोड्या वेळाने दोघेही नॉर्मल झाले मग आम्ही डॉक्टर ला धन्यवाद करून परत पुढे निघालो.
 
अगदी महत्वाची सूचना:
जर तुम्ही कार ने जात असाल, तर गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवा. कार मध्ये एकदम पॅक होऊन बसल्यानं बाहेर तापमान लक्ष्यात येत नाही. एकदम AC मधून बाहेर येऊन पळा-पळी झाली कि ऑक्सिजन ची कमी भासते.

प्रचंड थंडी आणि अतिप्रचंड भूक, फार वाईट समीकरण असते. घाटाच्या शेवटला एक गाव आहे, "दुर्बुक", तिथे जेवणाचा बेत होता. अंतर काय संपेना.
वाकडा तिकडं वाकडा तिकडं रास्ता, कमालीचे वळणदार उतार. Like said Before Leh will Test your Personality.

मध्ये रस्त्यातून नदीचे पाणी आले होते, त्या क्रॉसिंग ला बराच वेळ गेला. शेवटी आम्हाला "दुर्बुक" चा बोर्ड दिसला आणि मग कुठं जरा बरं वाटलं. तिथे गावात जेवणाचे बरेच पर्याय आहेत. नवनाथ गुरुजींचे ठरलेले हॉटेल मध्ये आम्ही गेलो. आज "चायनिज स्पेशल" होते. भूक लागली होती म्हणून, का जेवण खरंच चांगले होते म्हणून, पण मला तो "राईस" फार आवडला. तिथे जेऊन आम्ही थोडी विश्रांती घेऊन बाहेर पडलो. आता पल्ला १०० किलोमीटर चा होता. इथून पुढे रास्ता म्हणजे गुळगुळीत. 
"मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक", आम्ही सगळयात शेवट ला. सगळ्यांचे फोटो आणि विडिओ काढत.
दुर्बुक ला प्रचंड मिलिटरी थोफा आहे, सगळी कढे सैन्यच सैन्य, त्यांच्या जीप त्यांचे ट्रक, बसेस आणि बरेच काही. 
दुर्बुक ते पॅंगॉन्ग रास्ता एकदम "Mesmerising" म्हणजे मंत्रमुग्ध करणारा आहे.

तुम्हाला एक टक्का जरी गाडी येत असली तर, इथे नक्की चालवा, असा रास्ता परत दिसणार नाही.

इथे प्रत्येक रस्त्यावर वळण आहे, प्रत्येक वळण अवघड आहेत , भरपूर थंडी आहे , जॅकेट आणि ग्लव्हज पण थांबवू शकत नाहीत इतकी, पण हेच तर लेह आहे, ह्या साठीच तर हजारो मैलाचा प्रवास करून भटकंती करणारे इथे येतात. "In the Midst of Chaos, find your Inner Peace".

ह्या मार्गावर फोटो साठी बरेच लोकेशन आहेत. आम्ही पण अश्याच एका ठिकाणी थांबलो. अगदी क्षितिज पर्यंत सरळ रास्ता, एक इंचाचे पण वळण नाही.

Mandatory Photo

दोन-तीन तासाचा खडतर प्रवास करून आम्ही शेवटी पॅंगॉन्ग लेक ला पोहोचलो. लेक फार मोठी, क्षितिजा पर्यंत पाणीच पाणी, समुद्राचा भास येतो. अगदी लेक च्या किनारी थोडा उंच टेकडी आहे, तिथे सगळ्या टेन्ट आणि कॉटेजेस आहेत. आज चे हॉटेल होते "वंडरलँड कॉटेज". नवनाथांची हॉटेल च्या निवडीला तोड नाही. लेक च्या अगदी समोर कॉटेज होते. तिथे गेल्या गेल्या मस्त चहा आला. पहिला चहा घेतला, कारण थंडीने हात बधिर झाले होते.
गरम गरम कप हातात धरून बरे वाटले.

 

Evening Tea@ Chilling Pangong

वूडन टेन्ट होत्या, डबल बेड विथ ऍटॅच बाथरूम. रूम प्रशस्थ होती. थंडी भरपूर होती, सगळे लिस्ट प्रमाणे दिलेल्या टेन्ट मध्ये विसावले. कँटीन शेजारीच होती.
रात्री बुफे होता. नीलम ला ताप आल्या सारखे वाटत असल्याने तिने जेवण नको म्हणून सांगितले. पण सर्वांच्या आग्रह मुळे तिने दाल राईस तेवढा खाल्ला. सोबत ताप, अशक्तपणा आणि पित्ताच्या गोळ्या बरोबर आणल्याचं होत्या. एक डोस घेऊन ते झोपी गेली. आम्ही जेऊन बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो. थंडी बरीच होती , रात्री तापमान फक्त २ डिग्री इतके होते. गप्पा मारून आम्ही पण टेन्ट मध्ये आलो.
बऱ्याच वर्षा नंतर इतका मोठा बाईक प्रवास केला होता, मनात आनंद होता पण शरीराला हे पटत न्हवते. बॉडी कडून सिग्नल आला, आता झोपी गेले पाहिजे.
One more Day well Spent.

Most Joyful Journey

उद्या चा पदिवस आज सारखाच असणार होता, पॅंगॉन्ग वरून लेह चा परतीचा प्रवास


II क्रमश II 

पाचवा दिवस :  : पॅंगॉन्ग ते लेह (परतीचा प्रवास)