कोल्हापूर ची माणसं दिलखुलास दिलखुलास , कोल्हापूर ची भाषा दिलखुलास.
कोल्हापूर प्रती कोल्हापूरकरांचं प्रेम जग-जाहीर आहे, मी ही त्यातलाच एक.
हे लिखाण अश्याच एका कोल्हापुरात आलेल्या छानशा अनुभवा विषयी.
मला बोलायची फार सवय , मग समोर कोणीही असो.
एकदा आमचं जमलं कि जमलं , मग आम्ही तटत नाही.
मुलांच्या वाट्याला आलेल्या कामातील एक सर्व साधारण काम "गिरणीतून दळप आणणे".
मी दळप आणायला गिरणीत गेलो, तिथले काका आपले खास. लहानाचं मोठं आम्ही त्यांच्या समोर झालो एवढी जुनी ओळख.
तसं घरातून गिरणीत मीच जातो, पण ह्या वेळी गिरणीत जाण्याचा योग फार दिवसांनी आला.
काकांची सवय मी गिरणीत गेलो कि मला मिठी मारून सगळं पीठ लावायचं , म्हणून मी गिरणीत नेहमी पांढरे शुब्र कपडे घालून जायचो. सकाळी नीलम दळप ठेऊन आलेली मग मी दुपारी दळप घ्यायला गेलो.
मी गेलो तेव्हा गिरण बंद होती.
पुण्यात राहून दुपारच्या झोपेचं महत्व मला कळलं आहे, म्हणून शक्यतो मी कुणाची दुपारची झोपमोड करत नाही.☺☺☺
मी परत निघणार इतक्यात एका बाईने घराची बेल वाजवली. काकांचं घर गिरणी मागच आहे.
काका लगेच बाहेर आले. त्यांना येताना बघितलं आणि मी गिरणी बाहेर बसायला केलेल्या कट्या वर बसलो.
काका म्हणजे सडपातळ आणि उंच व्यक्तिमत्वं. वयानुसार डोक्याचे केस कमी आलेले. नेहमी विजार आणि शर्ट मध्ये दिसायचे. चेहऱ्यावर नेहमी एक मिश्किल स्मितहास्य असायचं.
मला गिरणीतील काम करणाऱ्यांचं तितकंच कौतुक आहे जितक साडी दुकान मधल्या सेल्समन चं. गिरणीत ९० % गिराइक बायकाच, आमच्या सारखे कमीच. इतक्या बायका, त्यांचा गोंधळ, त्यांचा दंगा -धावपळ हे सगळं व्यवस्तीत manage करून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे म्हणजे माझा परीने कौतुकास्पद आहेच.
काका गिरणीत आले, मला बघून म्हंटले थांब आलोच. त्या बाईचं दळप दिलं आणि बाहेर आले.
त्यांनी नेहमी प्रमाणे मला मिठी मारली, पण गिरण अत्ताच उघडल्या मुळे, ना त्यांना जास्त पीठ लागलं ना मला.
गिरणीत कोण नव्हतं , काकां बरोबर किरकोळ गप्पा रंगल्या. थोड्या वेळात मी त्यांचा निरोप घेतला.
मी नेहमी म्हणतो "भेटू परत", पण ह्या वेळी त्यांना म्हणालो "काळजी घ्या...!!!"
त्यांचं त्यावर अनपेक्षित प्रतिप्रश्न आला "कुठं मिळते..??"
मी भुवया उंचावल्या, ते परत म्हणाले," म्हंटलास ना काळजी घ्या, ती काळजी कुठं मिळते..!!!"
मी आपल्या नेहमी च्या शैलीत उत्तर दिलं, हृदयावर हात ठेऊन म्हंटलं " इथं मिळते इथं..!!"❤❤❤
काका एकदम हसले, "अरे वाघा".
"कोण मला म्हंटलं काळजी घ्या, कि मी विचारतो कुठं मिळते"
"त्रास देणारी, ताप देणारी वाट्लस तर पैसे व्याजानं देणारी पण बरीच असतात , पण "काळजी देणारं" कधी कुठं कोणचं नसतं बघ".
काका कदाचित एकदम मनातल दुःख/ व्यथा बोलून गेले असं मला वाटलं.
मी त्यांना हस्तांदोलन करून निघालो.काकांचे ते शब्द माझा मनात घर करून बसले.
काकांना दोन मुली, दोघींची हि लग्न झालेत. घरी आता फक्त काका आणि काकीच असतात.
प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा ह्यांची किंमत एकटं राहणार्यांना जास्त माहित असते.
एक वाक्य, "काळजी घ्या, पण कुठं मिळते", मी रात्रभर विचार करत होतो.
"तसं बघायला गेलं तर दोन शब्द "काळजी घ्या", पण तेच जर निभवायचं म्हंटलं तर अक्ख आयुष्य कमी पडेल"
एकमात्र आहे "काळजी घ्या" हे शब्द फक्त आपली आणि आपलीच माणसं वापरतात.
कधी जर कोणी तुम्हाला म्हणाले "काळजी घ्या", तर त्यांना नक्की विचारा "काळजी, मिळते कुठं..??"
NEIL-THE-STORY-TELLER
![]() |
| दोन शब्द पुलं चे |
